रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या प्रमुख शहरांमध्ये व ग्रामीण भागातही ईद निमित्त मोहल्ल्यांमध्ये सजावट करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ईदचा नमाज पडून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद निमित्त गुरुवार व शुक्रवार दोन दिवस बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. मिठाई व कपडे खरेदीकडे मोठा कल होता. ईद निमित्त काही मुस्लीम बांधवांनी नवीन वाहनेही खरेदी करुन कुटुंबियांना भेट दिली.
जिल्ह्यात मुस्लीम समाजातील अनेक नागरिक नोकरीनिमित्ताने सौदी व परदेशामध्ये आहेत. अनेक नागरिक ईदनिमित्ताने आपल्या गावी आले असल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी ईद निमित्त अनेकांनी आपले नातेवाईक व मित्रमंडळींच्या घरी जाऊन ईद निमित्त मिठाई, शिरकुरमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शनिवारी रत्नागिरीमध्ये मुस्लीम बांधवांनी थिबापॅलेस, मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला. शहरातील अनेक बागाही भरुन लहान मुलांनी फुलून गेल्या होत्या.