रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता चाळीऐवजी आलिशान इमारतीमध्ये हक्काचे निवासस्थान मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी २१६ तर अधिकाऱ्यांना ६ अशी २२२ निवास्थानांचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया झाली असून सुमारे १२३ कोटी ९० लाखाचा हा प्रकल्प आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
नुकतीच या गृहनिर्माण प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. तत्कालीन म्हाडाचे अध्यक्ष आणि विद्यमान उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यासाठी प्रयत्नशील होते; मात्र सुरवातीला या गृहनिर्माण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिस दलाकडून जागेचा विषय मार्गी लागल्यानंतर हा प्रकल्प आता गती घेणार आहे. जिल्हा पोलिस दलातील अनेक कर्मचारी चाळीमध्येच राहत आहेत. त्यापैकी काही चाळींची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर चाळींवर प्लास्टिकचा कागद मारून पावसाळा काढावा लागत होता. दरवाजे, खिडक्यांची दुरवस्था असायची. सार्वजनिक बांधकाम विभागाला येणाऱ्या निधीतून याची दुरुस्ती होते; परंतु येणारा निधी जिल्ह्यातील शासकीय इमारतींसाठी असायचा. त्यामुळे २४ तास जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाळ दुरुस्त करायला निधीच उरायचा नाही.
जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आता सर्व पायाभूत सुविधा असलेल्या आलिशान खोल्या मिळणार आहेत. रत्नागिरी पोलिस अधीक्षक यांच्यासाठी टाईप-२ चे २१६ निवासस्थाने, टाईप-३ चे ६ निवासस्थाने होणार आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालय व राखीव पोलिस निरीक्षक कार्यालय येथे सर्व पायाभूत सुविधांसह इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) यांच्याकडून ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत १२३ कोटी ९० लाखाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलाने याला दुजोरा दिला.









