रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या नऊ धडाकेबाज गिर्यारोहकांनी केला वजीर सुळका सर

रत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका. ज्याला “वजीर सुळका ” या नावाने ओळखले जाते. दुर्गम परिसर, उंचच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90° अंशातील 250 फुट उंचीचा सरळ “वजीर सुळका”. जिथे ही दृश्य पाहून सर्व सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द, चिकाटी आणि साहस याच्या जोरावर रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या नऊ धडाकेबाज गिर्यारोहकांनी 9 एप्रिलला वजीर सुळका यशस्वीरित्या सर करून भारतीय राष्ट्रधज फडकावला.

निसरडी गवताळ पाऊलवाट, 90° अंशातील सरळ अशी उभी अतिकठीण चढाई, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतर जवळपास 600 फुट खोल आणि पाण्याची प्रचंड कमतरता. या सुळक्यावरती चढाई करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे जरी गेला तरी त्या व्यक्तीला थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती घ्यावी लागते अशी चर्चा केली जाते. या वजीर सुळक्यावरती चढाई करण्याची कल्पनाही करणं अश्यक्य असते. मात्र रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या टीमने सुळक्यावरती यशस्वी चढाई करून अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.