रत्नागिरीत आंबा संशोधन केंद्र उभारण्यासाठी हालचाली

रत्नागिरी:- बदलत्या वातावरणाने गेली पाच वर्षे आंबा उत्पादनात सातत्याने घट होत आहे. यासाठी रत्नागिरीतील बागायतदरांसाठी आंब्यावर होणार्‍या वातावरणातील बदलाचे परिणाम जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार खबरदारीचे उपाययोजना सुरू करण्यासाठी आंबा संशोधन केंद्राची मागणी बागायतदारांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देताना कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली जागा निश्चितीच्या सूचना कोकण
विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिली.

आंबा उत्पादनाचे घटलेले प्रमाण हे चिंता वाढवणारे असल्याची कैफियत अलिकडेच बागायतदरांनी प्रशासनासमोर मांडली होती. याबाबत कारणमीमांसा होण्याबाबत ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी सर्वच बागायतदारांनी लावून धरली होती. बागायतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी लवकरच हापूस आंबा संशोधन केंद्र मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बागायतदारांना दिले होते. गेली चार-पाच वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच या परिसरात बागायतीमध्ये फळधारणेचे प्रमाण सातत्याने घटत असल्यामुळे येथील शेतकर्‍यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत कृषी खात्यासह पर्यावरण खात्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.
त्यानुसार या तक्रारीची दखल घेऊन कोकणातच प्राधान्याने रत्नगिरी जिल्ह्यात आंबा संशोधन केद्र सुरू करण्यासाठी कोकण कृषीविद्यापीठाचे मार्गदर्शन घेणार आहे.