कोरे मार्गावर चार समर स्पेशल गाड्यांची घोषणा

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर चार समर स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पुढील महिन्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फेर्‍या चालवण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.

या संदर्भात कोकण रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते सावंतवाडी साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर रविवारी सुटणार आहे. 2 एप्रिल ते 4 जून या कालावधीत रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी सुटून सावंतवाडीला दुसर्‍या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी येथून बुधवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्याला रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एकूण 22 डबे जोडले जाणार आहेत. समर स्पेशल दुसरी गाडी सावंतवाडी रोड- पनवेल- सावंतवाडी अशी आठवड्यातून एकदा धावेल. 3 एप्रिल ते 5 जून या कालावधीत दर सोमवारी सुटणार आहे. ती सावंतवाडीतून सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला रात्री ती साडेआठ वाजता पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास पनवेल येथून रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल.
तिसरी समर स्पेशल पनवेल ते करमाळी मार्गावर आठवड्यातून एकदा धावणार आहे. ती 3 एप्रिल ते 5 जून या कालावधीत धावणार आहे. पनवेल येथून दर सोमवारी चालवली जाईल. पनवेल येथून ती गाडी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. करमाळी येथून ती दर मंगळवारी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पनवेलला रात्री साडेआठ वाजता पोहोचेल. चौथी समर स्पेशल गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान आठवड्यातून एकदाच धावणार आहे. 6 एप्रिल ते 1 जून या कालावधीत दर मंगळवारी ही गाडी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ही गाडी सायंकाळी चार वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री ते अकरा वाजून वीस मिनिटांनी कन्याकुमारीला पोहोचेल. कन्याकुमारी येथून ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ती रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.