रत्नागिरी:- घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिका प्रशासाने कठोर पावले उचलली आहेत. घरपट्टी वसुलीसाठी ७ पथके कार्यरत ठेवली आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता कर वसुली सुरू आहे. त्यामुळे आज दिवसभरात घरपट्टी थकित असलेले एकूण ७१ नळ जोडण्यास तोडल्या असून घरपट्टी थकित असलेल्या ११२ मालमत्ता सील केल्या आहेत. पुढील चार दिवसांमध्ये आणखी कडक कारवाई करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याव पथकाचा भर आहे.
रत्नागिरी पालिकेने वसुलीचे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. कोरोना महामारीमुळे रखडलेल्या कराने घरपट्टी वसुलीचा आकडा १० कोटीवर गेला आहे. आतापर्यंत पालिकेच्या पथकांनी कारवाई करून आणि नागरिकांना आवाहन करून ७० टक्के म्हणजे ८ कोटी रुपये वसुली झाली आहे. मार्चअखेरीस आता फक्त चार दिवस उरले आहेत. त्यामुळे पालिकेने वसुली पथकांमध्ये वाढ केली आहे. सात पथके कार्यरत असून, कोणाचाही राजकीय दबाव न जुमानता कारवाई सुरू आहे. काहींनी माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्षांच्या नावाचा वापर करण्याच प्रयत्न केला; परंतु प्रशासनानेही कठोर भूमिका घेऊन ही कारवाई सुरूच ठेवली. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी तर कारवाईमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पथकाकडून जोरदार करवसुली आणि कारवाई सुरू आहे. सात पथकांनी आज घरपट्टी थकवलेल्या ७१ जणांची नळजोडणी तोडली आहे तर ११२ मालमत्ता सील केल्या आहेत. या धडक मोहिमेमुळे वसुलीचा टक्का ७० टक्केवर गेला आहे.