रत्नागिरी:- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० औद्योगिक वसाहतींमधील औद्योगिक विकास रोडावलेलाच आहे. मोठे उद्योग येण्याच्या फक्त घोषणाच होत आहेत. प्रत्यक्षात मात्र येणार्या उद्योगाला प्रदुषणाचे कारण पुढे करत विरोध होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला उतरती कळा लागली आहे. उद्योगमंत्री जिल्ह्याच्या औद्योगीक क्रांतीसाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी बंद पडलेले काही कारखाने सुरू करण्याची घोषणा केली तरी जिल्ह्याचा अपेक्षित औद्योगिक विकास खुंटलेलाच आहे. दोन्ही जिल्ह्यात छोटे-मोठे २ हजार ६५४ कारखाने आहे. त्यापैकी २४४ कारखान्यांची धडधड थांबली आहे.
रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाने नुकताच शासनाला दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक स्थितीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये ही वस्तुस्थिती पुढे आली आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्यादृष्टीने ही बाब चिंतेची आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनतरी २ हजार ६५४ कारखाने तग धरून असले तरी अजून कारखानदारी वाढण्याची गरज असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कोकणवासीयांना मोठी आशा आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यात रत्नागिरी-झाडगाव, रत्नागिरी-मिरजोळे, लोटे, लोटे परशुराम, खेर्डी चिपळूण, गाणे खडपोली, साडवली-देवरूख, दापोली, दाभोळ आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) अशा १० औद्यागिक वसाहती आहेत. या एमआयडीसीमधील २ हजार ९४८भूखंड आहेत. त्यापैकी २ हजार ६५४ आरक्षित झाले असून, त्यावर छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यापैकी अनेक भुखंडांवर फक्त छप्पर मारले किंवा कच्चे बांधकाम करून ठेवले आहे. प्रत्यक्ष किती उद्योग सुरू हा संशोधनाचा विषय आहे. नवीन छोटे-मोठे कारखाने आले तर हातांना रोजगार मिळणार आहे. त्याला जोडून नवे उद्योग सुरू होणार आहेत. त्यामुळे आता मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे.









