रत्नागिरी:- जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी निधी खर्च करण्यात आला; मात्र दरवर्षी होणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांच्या क्रीडा स्पर्धांकडे दुर्लक्षच झाले. शैक्षणिक वर्ष संपत आले असुन लवकरच वार्षिक परिक्षाही सुरु होतील. तरीही मुलांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी होणार्या स्पर्धांबाबत प्रशासनाची भुमिका उदासीन आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धांचे बिगुल कधी वाजणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खेळाडू घडण्याचा पाया जिल्हा परिषद शाळांमधून सुरु होतो. हे लक्षात घेऊन दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कुठल्याही खेळाडूच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीला शालेय जीवनापासूनच सुरूवात होते. सुरूवातीला जिल्हा पातळीवर होणार्या या स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय व इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडापटूंना त्यांच्यातील क्रीडा गुण दाखवता येते. अलिकडच्या काळात खेळांमधील सहभाग वाढलेला आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे डिसेंबर महिन्यात तालुकास्तरावर आणि त्यानंतर जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. वैयक्तिक स्पर्धांस सांघिक खेळांचा समावेश यामध्ये केला जातो. यंदा काही तालुक्यांनी केंद्र व बिट स्तरावर स्पर्धा घेतल्या. परंतु त्याचा खर्च वर्गणी काढून केल्याची माहीती पुढे येत आहे. मुळात दरवर्षी जिल्हा परिषद सेस फंडातून क्रीडा स्पर्धांसाठी निधी दिला जातो. गेली तीन वर्षे स्पर्धा न झाल्यामुळे हा निधी खर्ची पडलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबाबत दुर्लक्ष करणार्या जिल्हा प्रशासनाने कर्मचार्यांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात घेतल्या. जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलनही पार पडले. त्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली. परंतु खेळाचा पाया मजबुत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी घेतल्या जाणार्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांकडे दुर्लक्ष झाले आहे. खर्या अर्थाने प्रशासनाकडून याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांमधील खो-खो, कबड्डीसह मैदानी खेळातील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकले आहेत. याची जिल्हा परिषद अधिकरी, आमदार तसेच मंत्री दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









