मुंबई बाजार समितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत वाढली!

रत्नागिरी:- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक वाढली आहे. या आठवड्यात दररोज अकरा हजारपेक्षा अधिक पेट्या दाखल होत आहेत. त्यातील साडेसात हजार पेट्या कोकणातील असून रत्नागिरी जिल्ह्यातील वीस टक्के पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंब्याची आवक १५ मार्चनंतर वाढेल असा अंदाज आहे. सध्या २ हजार रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीचा दर आहे.

मुंबईसह आजुबाजूच्या परिसरामध्ये आंब्याची विक्री वाशी बाजार समितीमधून केली जाते. त्यामुळे कोकणातील सर्वाधिक आंबा हा वाशीतच पाठविला जातो. गेल्या काही वर्षात कोरोनामुळे थेट विक्रीवर भर दिला जात असला तरीही अजुनही मोठा बागायतदार दलांदावरच अवलंबुन आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस देवगडमधून मोठ्याप्रमाणात आंबा बाजारात रवाना झाला. तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण कमी आहे. चालु आठवड्यामध्ये सलग चार दिवस अकरा हजाराहुन अधिक पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या. गुरुवारी (ता. २) सकाळी आलेल्या अहवालानुसार ७ हजार ४३४ पेटी कोकणातून तर ४ हजार ३०१ पेटी इतर राज्यातून वाशीत दाखल झाली. कोकणातून आलेल्या पेट्यांपैकी ८० टक्के देवगडमधुन तर उर्वरित वीस टक्के रत्नागिरीतुन आल्याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला दिड हजार पेटी वाशीत येत होती. तसेच यंदा फेब्रुवारीमध्येच आंबा दाखल झाला. त्यात सर्वाधिक देवगडचाच होता. ४ ते ८ डझनाची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जाते. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे.