जिल्ह्यातील 19 हजार 199 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

रत्नागिरी:- दहावी बोर्ड परीक्षा गुरुवार, दि. 2 मार्चपासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनीही जोरदार तयारी केली असून, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही धास्ती लागली आहे. दरम्यान, या परिक्षेसाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. दहावीच्या 73 केंद्रांवर 16 भरारी व बैठ्या पथकाद्वारे वॉच राहणार आहे. या परीक्षेला 19 हजार 199 विद्यार्थी बसणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय भरारी पथके तयार केली आहेत. या परीक्षांच्या भयमुक्त व कॉपीमुक्त आयोजनाबाबत राज्य मंडळाने शिक्षासूची जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हयामध्ये भयमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.रत्नागिरी किर्तीकिरण पुजार, शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे या वर्षांच्या परीक्षार्थीना निकोप वातावरणामध्ये परीक्षा देण्यास मदत होणार आहे. तसेच कॉपी बहाद्दरांवर 16 भरारी पथकांची करडी नजर असणार आहे.

यावर्षी परीक्षा आयोजनामध्ये राज्यमंडळाने कडक शिक्षासूची जाहीर केली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचता यावे यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांसह आगार प्रमुखांनी वेळेवर बसेस सोडाव्यात. तसेच विद्युत पुरवठा परीक्षा कालावधीमध्ये खंडित होऊ नये याबाबतचा पत्रव्यवहार शिक्षण विभागामार्फत करण्यात आला आहे.

परीरक्षक केंद्रापासून परीक्षा केंद्रांवर पोहोचवणार्‍या प्रश्नपत्रिका परिरक्षकांना जीपीएस प्रणाली लोकेशनद्वारे ट्रॅक केले जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यात 10 वी साठी 73 केंद्र असणार असून यामध्ये 19 हजार 199 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.