‘असर’ संस्थेच्या अहवालात जिल्ह्यातील मुले गणितामध्ये अव्वल 

रत्नागिरीः– कोरोना महामारीनंतर विद्यार्थ्यांच्या वाचन, लिखाणावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. असर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर देशासह राज्यात अनेक विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शाळेतील मुले गणितामध्ये अव्वल ठरली आहेत. गेले काही महिने जि. प. च्या शिक्षण विभागाने ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ हा उपक्रम सुरु केला आहे. याची परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे.

गणित आणि भारत यांचा वैदिक काळापासून संबंध आहे. आर्यभट्ट, रामानुजन, भास्कराचार्य, ब्रम्हगुप्त अंशा जगप्रसिध्द गणित तज्ञांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. गणित हा तसा खूप रोचक विषय आहे, परंतु तो ज्याला समजला त्यासाठीच तो रोचक ठरतो. आणि ज्यांना हा विषय समजला त्यांच्या बुध्दीमतेला विशेष दर्जा प्राप्त होतो असेच म्हणावे लागेल. दैनंदिन जीवनात गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोजमाप, गणना, हिशोब, तर्क – अंदाज, एकीकरण, निकष या गणितातील अगदी प्राथमिक आणि मूलभूत संकल्पना आहेत. गणित हा सर्व विज्ञानाचा मूळ आधार आहे. आपले नित्याचे व्यवहार अधिक सुसह्य करणे हा विज्ञानाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे. दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या अनेक सुविधा या गणित आणि विज्ञानाच्या प्रगतीचा परिपाक आहे. त्यामुळे माणूस फक्त हिशोबासाठी जरी गणित वापरत असेल तरी त्याचे जीवन अशा अनेक गोष्टींनी व्यापलेले आहे, जिथे त्याच्या कळत- नकळत गणिताचा उपयोग झालेलाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जि.प.  शिक्षण विभागाने आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य असा उपक्रम हाती घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती नाहिशी करणे,  गणित विषयाची आवड निर्माण करणे,  गणिताच्या अभ्यासाने विचार करण्याची सवय लावणे, ती सवय दैनंदिन व्यवहारात वापरण्याची सवय लावणे,  शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे,  स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे,  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आदी या योजनेचे उद्दीष्ट आहे.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 3 री ते 7 वी साठी ही योजना राबवावण्याचा निर्णय घेण्यात आला.  जून महिन्यामध्ये सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेला योजनेबाबत माहिती देण्यात आली. जुलै महिन्यामध्ये झुमद्वारे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची दुसरी सहविचार सभा घेण्यात आली. गणिताच्या अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ योजनेखाली होणार्‍या परीक्षेसाठीच्या नियोजनासाठी जास्तीतजास्त 50 शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन केंद्रस्तरावर करणेत येईल, जी फक्त गणित विषयाच्या संबंधित इयत्तेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. परीक्षेसाठीचे सर्व गोपनीय साहित्य जिल्हास्तरावरून पुरविले जाईल, तथा केंद्रसंचालक म्हणून जवळच्या तालुक्यांचे केंद्रप्रमुख घेण्यात येतील. यामुळे परीक्षा संचालनात पारदर्शकता येईल. आपापल्या केंद्राची गुणवत्ता यादी करण्याचे काम केंद्रप्रमुखांचे असेल. केंद्रनिहाय गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून इयत्तानिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात येतील व हे काम गट शिक्षणाधिकारी यांनी करावयाचे आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम तालुकास्तरावर प्रमाणपत्र देऊन केला  जाणार आहे. एप्रिल 2023 मध्ये योजनेची यशस्वीता तपासली जाणार आहे, अशी या उपक्रमाची कार्यपद्धती आहे.

गुणवत्त्ता वाढीसाठी जि.प. तर्फे विविध उपक्रम
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गुणवत्ता वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी गुणवत्ता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. त्याचा फायदा जि.प. च्या मराठी शाळांना झाला आहे. शिष्यवृत्ती परिक्षा तसेच नवोदय विद्यालयाच्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये मुलांचा टक्का वाढला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार व शिक्षणाधिकारी  वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे व संदेश कडव हे या उपक्रमाचे नियोजन करत आहेत.