सवलत योजनेच्या माध्यमातून काजू प्रक्रिया प्रकल्पांना बुस्टरद्वारे संजीवनी

रत्नागिरी:-कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाने व्याज दर सवलत योजना लागू केली आहे. सवलत योजनेच्या माध्यमातून कोकणातील काजू फळपिक विकास योजनेंतर्गत काजू प्रक्रिया प्रकल्पांना बुस्टरद्वारे संजीवनी देण्यात येणार आहे.

कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन ‘बी’, ‘सी’, आणि ‘के’ चे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. त्यामुळे कोकणातील काजूची तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; काजू व्यवसाय कोकणात वृध्दींगत व्हावा यासाठी निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात आली आहे.

काजू बोर्ड स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यानुसार बागायतदरांचे संघटनही करण्यात येणार आहे. बागायतदारांबरोबच काजू उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेत प्रक्रिया उद्योजकांनाही सहभागी करुन घेेण्यात येणार आहे. ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिक तत्वावर ओला काजूगर काढण्याचे यंत्र बागायतदार, उद्योजकांना  अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात  येणार आहे.