रत्नागिरी:- लागवड कमी असलेल्या बागायतदारांनाही काजू बी ची निर्यात करता येईल असा निर्णय काजू बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरीतील एमआयडीसीमधील दळवी कॅश्यू प्रक्रिया प्रकल्पाजवळ सुरु असलेल्या काजू महोत्सवात ते बोलत होते. यावेळी काजू प्रक्रिया धारक संघाचे अध्यक्ष विवेक बारगिर, संदेश दळवी, मुकेश देसाई, प्रताप पवार, संदेश पेडणेकर, तौफिक खतिक, दिनेश पवार, जिल्हा परिषद माजी सभापती बाबू म्हाप यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी काजू संघातर्फे मंत्री सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री सामंत म्हणाले, कोकणातील काजू व्यावसायिक, उत्पादक आणि प्रकियाधारक यांना सरकारने मदत केली पाहीजे ही अनेक वर्षाची मागणी आहे. सहा महिन्यापुर्वी स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मी उदयोगमंत्री झाल्यानंतर काजू उत्पादक आणि व्यावसायिकांसाठी तातडीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बागायतदार, प्रक्रिया युनिट आणि या सर्वांमध्ये काम करणारे यांच्या उत्कर्षासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटमध्येही २०० कोटी रुपयांची तरतुद केली असून आठ दिवसात शासन निर्णयही येईल. हा निर्णय घेऊन आम्ही थांबलेलो नाही, तर निर्यातीच्यादृष्टीने छोट्यात छोट्या उत्पादकालाही काजू बी निर्यात कशी करता येईल यादृष्टीने बोर्डाच्या माध्यमातून तरतुद केली गेली आहे. कोकणातील काजूला प्रचंड मागणी आहे; परंतु आफ्रीकन काजूही तेवढाचा आयात केला जातो. यासाठी पडीक जमिनींवर काजूची जास्तीत जास्त लागवड कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहीजे. काजू हे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे.