रत्नागिरी:- कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमधील हजारो बालके तसेच शाळांमधील मुलांचे आरोग्य हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. नेमकी हिच गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील 18 वर्षे वयोगटाखालील बालकांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 लाख 99 हजार 759 जणांची तपासणी होणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.
करोना काळातील मागील दोन वर्षात राज्यातील बालकांच्या आरोग्याकडे म्हणावे तेवढे लक्ष देणे आरोग्य विभागाला शक्य झाले नव्हते. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतच्या डॉक्टरांच्या माध्यमातून शाळांमधील तसेच अंगणवाड्यांमधील बालकांची नियमित तपासणी करण्यात येत असते. तथापि मागील दोन वर्षात यात खंड पडला. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शून्य वयोगटातील सर्व बालकांच्या आरोग्याची सर्वांगिण तपासणी करण्याची संकल्पना मांडली असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाकांक्षी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकांच्या शाळा तसेच खासगी शाळा आणि अंगणवाड्यातील बालके अशी सुमारे दोन कोटी 92 लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाने ही मोहीम राबविण्यासाठी नियोजन केले असून यात आरबीएसकेचे डॉक्टर, भरारी पथकांचे डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने व्यापक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
रोज सुमारे 150 मुलांच्या आरोग्याची तपासणी
साधारणपणे प्रत्येक वैद्यकीय अधिकारी या मोहीमेत रोज सुमारे 150 मुलांच्या आरोग्याची तपासणी करेल. मुलांची डोळ्यांच्या तपासणीपासून मौखिक आरोग्य रक्तदाब तपासणीपासून विविध आजारांचा विचार करून तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या संख्येनुसार एक पथक स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका व आशा यांचा समावेश असणार
आहे.