पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी कुणबी बांधव एकवटणार

राजापूर तहसील कार्यालयावर काढणार निषेध महामोर्चा 

रत्नागिरी:- सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कुणबी समाजाचे एक निर्भीड पत्रकार शशिकांत वारीशे यांचा गुंड प्रवृत्तीचा पंढरीनाथ आंबेरकर याने भर दिवसा स्वतःच्या चार-चाकी वाहनाने अपघात रुपी निर्घृण खून केला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व कुणबी बांधव एकवटले असून ११ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय राजापूर येथे निषेध महामोर्चा काढण्यात येणार आहे. 

सोमवारी सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी आपल्या ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. ” पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात हि बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला धडक देत २०० ते २५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात वारीशे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.

पत्रकार शशिकांत वारीसे हे कोकणात सरकारकडून प्रस्तावित केलेली महाप्रदूषणकारी पेट्रो केमिकल ऑईल रिफायनरी कोकणात होऊ नये, प्रदूषणापासून एकंदरीत कोकणाचे संरक्षण व्हावे व त्या रिफायनरीमुळे राजापुरातील जवळजवळ सर्व कुणबी समाज उध्वस्त  होऊ नये. तसेच स्थानिक जनतेची रिफायनरी विरोधी भूमिका आपल्या लेखणीतून मांडत होते. आणि याचाच राग मनात ठेवून गुंड प्रवृत्तीचा पंढरीनाथ आंबेरकर याने त्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवार  दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता राजापूर शहर येथील तहसील कार्यालयावर कुणबी बांधवांकडून निषेध महामोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार समाज बांधवाच्या घरच्या मंडळींना सहानुभूतीचा पाठिंबा देण्यासाठी व आपल्या समाजाची एकी दाखविण्यासाठी सर्व कुणबी बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले आहे.