रत्नागिरी:- हातखंबा येथील दर्ग्याजवळ झालेल्या ट्रक अपघातात स्वतःच्या मृत्यूस आणि क्लिनर तसेच वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख इस्वाकसाब जमादार (34, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख जमादार हा आपल्या ताब्यातील साखरेने भरलेला ट्रक घेउन कर्नाटक ते जयगड असा जात होता. हातखंबा येथील दर्ग्याजवळ आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. ट्रक रस्त्याच्या बाजूला जावून पलटी झाला. यामध्ये क्लिनर कमरान नुरसाब कलादगी (20, बागलकोट, कर्नाटक) याला दुखापत झाली. तसेच स्वतः ट्रक चालक फारुख याचा यामध्ये मृत्यू झाला. तसेच गाडीचे प्रचंड नुकसान झाले. या अपघाताची खबर शर्वरी शिवाजी सनगरे (40, सनगरेवाडी, हातखंबा, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक फारुख याच्यावर भादविकलम 304 अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.









