रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योग मंत्रालयातर्फे राज्यभर रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून 12 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतून या मेळाव्याने सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्याच रोजगार मेळाव्यात सुमारे दोन हजारजणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मेळाव्यात रत्नागिरीत सुमारे पावणे दोनशे कंपन्या सहभागी होणार असून ‘ऑन दि स्पॉट’ ऑफर लेटर दिले जाणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश म्हाप यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयक विद्या कुलकर्णी, युवा हबचे केदार रहाणे व दीपक पवार उपस्थित होते.
उद्योग मंत्रालय व युवा हबच्या समन्वयातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्रव प्रशासनाच्या मदतीने हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. कोरोनानंतर अनेक तरुणांचा रोजगार गेला होता. अनेकजण छोटेछोटे उद्योग नोकर्या करीत आहेत. या युवावर्गाच्या हाती चांगले काम मिळाले या हेतूने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या प्रांगणात हा रोजगार मेळावा होणार आहे. यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करुन घेतली जाणार आहे. यामध्ये 172हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. 5वी पास ते विविध शाखांमधील पदवीधरांना यात रोजगाराची संधी मिळणार आहे. टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्याही यात सहभागी होणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
रोजगार मेळाव्यात कंपन्यांनी उमेदवाराची निवड केल्यावर त्याला तात्काळ ‘ऑफर लेटर’ दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या रोजगार मेळाव्यात रिमांड होममधील मुलांनाही संधी मिळावी अशा सूचना जिल्हा न्यायाधिशांनी केल्या असून, या उमेदवारांसह अपंगांचा विचार केला जाणार आहे, असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली असून त्याचे शुभारंभही यावेळी करण्यात आला. याठिकाणी क्यूआर कोडअसून त्यावरुनही अर्ज डाऊनलोड करता येणार असल्याचे युवा हबचे केदार रहाणे यांनी सांगितले.









