स्थानिक भक्त, पर्यटकांची होणार मोठी गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त
रत्नागिरी:- तालुक्यातील स्वयंभू श्री गजाननाचे स्थान असणार्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बुधवारी (ता. 25) माघी यात्रेला आरंभ होत आहे. माघीच्या निमित्ताने गणपतीच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यातील हजारो भक्तगण गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात यात्रेसाठी थाटलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी स्थानिकांसह परजिल्ह्यातील भक्तगणांची प्रचंड गर्दी होती.
कोरोनानंतर प्रथमच माघी यात्रा गणपतीपुळेत भरणार आहे. त्यामुळे देवस्थान आणि गणपतीपुळे ग्रामपंचायत यांनी विशेष नियोजन केले आहे. माघी गणशोत्सवामध्ये गणपतीपुळेत स्थानिकांची यात्रा भरते. यामध्ये गणपतीपुळे, भंडारपुळे, चाफे, निवेंडी, भगवती नगर, नेवरे, धामणसे, खंडाळा, जयगड, जांभळी व रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आलेले गणेशभक्त सहभागी होतात. माघीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भक्तगणांनीही मंगळवारपासूनच गणपतीपुळेत हजेरी लावली आहे. त्यामुळे लॉजिंग-हॉटेलमध्ये भाविकांची गर्दी होती. बुधवारी सकाळी मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, अभिजीत घनवटकर यांच्या हस्ते पूजा, आरती होणार आहे. मंदिर सकाळी पाच वाजता सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे. माघी यात्रेसाठी स्थानिक दुकानदारांबरोबरच जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यामध्ये गणपतीच्या मोदकांचा प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थांची विक्री करणारे यांचा सर्वाधिक समावेश आहे. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पथक यात्रेमध्ये भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी तैनात केले आहेत. गणपतीपुळेत होणारी गर्दी लक्षात घेऊन जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपतीपुळे किनारही जीवरक्षक उभे करण्यात आले आहेत. दरम्यान, स्वयंभू श्री गजाननाची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा सायंकाळी 4.30 ते 5.30 या कालावधीत होणार आहे. ही पालखी सजवण्यासाठी हार, फुलांची व्यवस्था कोल्हापूर येथील गणेश भक्तांनी केली आहे.
ग्रामपंचायतीकडून विजेसह पार्किंग व्यवस्था
गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून येणार्या वाहनांसाठी सागर दर्शन पार्किंग येथे वाहने उभी करण्याची व्यवस्था केली आहे. गणपतीपुळे कोल्हटकर थिटा ते मोरया चौक, आपटा थिटा ते एसटी स्टॅन्ड परिसर आणि आपटा थिटा ते मोरया चौक, गणपती मंदिर परिसर या भागात विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.