शिक्षक संघटनांचा आक्षेप
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा तिसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षकांची संख्या आणि बदलीसाठी विकल्प भरण्यासाठीच्या शाळांची संख्या यामध्ये मोठी तफावतीवरुन शिक्षकांमध्ये नाराजीच व्यक्त केली जात आहे. याबाबत शिक्षक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
कोरोनातील परिस्थितीनंतर सलग तिन वर्षांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या दोन टप्प्याच्या बदल्या झाल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यातील बदल्या झाल्या आहेत. तिसर्या टप्प्यात बदली अधिकार पात्र शिक्षकांना शाळा विकल्प भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. त्यात जुन्या आदेशानुसार बदलीसाठी तिस शाळांची नावे भरणे बंधनकारक होते; परंतु शिक्षक संघटनांकडून आलेल्या सुचनांनुसार बदल करत नव्या परिपत्रकानुसार शिक्षकांनी हव्या तेवढ्याच शाळा भरल्या तरीही चालू शकणार आहे. यामध्ये कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त तिस शाळांचे विकल्प भरता येतील. तिसरा टप्पा अवघड क्षेत्रातील शाळांतील शिक्षकांचा आहे. यामध्ये अवघड क्षेत्रात दहा आणि शाळेत पाच वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदलीसाठी निवडले गेले आहे. जिल्ह्यातील १ हजार ४७३ शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्याकडून बदलीसाठी विकल्प भरुन घेतले जाणार आहेत. शिक्षक संघटनानी केलेल्या दाव्यानुसार रिक्त पदे ३४३ असल्याने अनेक शिक्षक बदलीपासून वंचित राहू शकतात. तर प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार बदलीसाठी साडेसहाशेहून अधिक शाळा या बदलीसाठी ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत. या प्रक्रियेवरुन शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून काही शिक्षक बदलीपासून वंचित राहू शकतात अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शाळा निवडीसाठी अर्ज भरण्याची मुदत रविवारी (ता. १५) रात्री बारा वाजेपर्यंत आहे. दरम्यान, तफावत असली तरीही तिसरा टप्पा ऐच्छिक असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणार्या शिक्षकांची संख्या तुलनेत कमी राहते. त्यामुळे बदल्यांपासून वंचीत राहणार नाहीत असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.









