राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील डोंगरतिठा येथे कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये इम्तियाजी अजिम भाटकर (वय 50 रा.सागवे-कातळी) या महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वा. च्या सुमारास घडली. या अपघातामध्ये त्यांच्यासोबत असलेले अजीम हसन भाटकर (वय 50) आणि अहमद अजीम भाटकर (वय 14) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
राजापूर शहरातील बाजारपेठेतील जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले अजीम हसन भाटकर हे मयत पत्नी इम्तियाजी आणि मुलगा अहमद अजीम भाटकर यांच्यासमवेत राजापूरहून सागवे कातळी या आपल्या मूळ गावी सायंकाळी दुचाकीवरून निघाले होते. जैतापूर मार्गावरील डोंगरतिठा येथे आले असता मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये इम्तियाजी या जागीच गतप्राण झाल्या. दरम्यान, अपघाताच्या घटनेसंबंधित माहिती मिळताच राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांच्यासह नवजीवन हायस्कूलमधील शिक्षकवृंदांसह स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचाराआधीच इम्तियाजी यांचे निधन झाले होते. तर, या अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेले अजीम आणि अहमद यांच्यावर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या अपघाताचा सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.