रत्नागिरी:- मिऱ्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागाला होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी रत्नागिरीतील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेला. संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना या प्रश्नी चांगलेच फैलावर घेतले.
मिऱ्या गाव परिसराला चारही बाजून समुद्राने वेढलेले आहे. त्यामुळे या गावाला एमआयडीसीच्या पाणी योजनेवर अवलंबून रहावे लागत आहे. येथील नागरिकांच्या घर परिसरात पाण्याच्या विहीरी आहेत. पण त्यांचे पाणी मचूळ असल्याने एमआयडीसीच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागावावी लागत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे येथील ग्रामस्थ, विशेषकरून महिलावर्ग कमालीचा त्रस्त झालेला आहे. त्यामुळे त्रस्त महिलांनी दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या कार्यालयावर देखील धडक देउन या प्रश्नी जाब विचारला होता. पण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न महावितरणचा असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याने त्रस्त झालेल्या महिलांनी गुरूवारी दुपारी महावितरण कार्यालय नाचणे येथे मोर्चा नेला. संतप्त महिलांनी महावितरणच्या कार्यालयातच अधिकाऱयांच्या नावाने जोरदार हंगामा केला. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आलेली आहे. दरदिवशी कितीवेळा पैसे देउन पाणी मागवायचे असा सवालही संतप्त महिलांनी अधिकाऱयांना केला. अधिकाऱ्यांना या प्रश्नी कोणतीच जाण नसल्याचे सांगण्यात आले. जर अनियमित पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.