नव्या वर्षाच्या पहिल्या अंगारकीला गणपतीपुळेत भक्तांचा महापूर

रत्नागिरी:- अंगारकी चतुर्थीनिमित्त आज गणपतीपुळेत राज्यभरातील हजारो भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे अडीचच्या सुमारास भाविक दर्शनासाठी रांग लावून होते. पहाटे साडेतीनला दर्शन सुरू झाले ते दुपारपर्यंत सुरू होते. सुमारे ५५ हजाराच्यावर भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा गणपतीपुळे देवस्थानने केला. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पालखी सोहळाही उत्साहात झाला. पोलिस बंदोबस्त आणि देवस्थान समितीचे नियोजन चोख असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

इंग्रजी वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी होती. त्यात डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्टीला अनेक भाविक देवदर्शन आणि पर्यटन करून गेल्याने गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु अपेक्षेपेक्षा जास्त भाविक राज्यातून गणपतीपुळ्यात दाखल झाले होते. मध्यरात्री दोन ते अडीचनंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावण्यास सुरवात केली. पहाटे साडेतीनला देवस्थानमार्फत दर्शन सुरू झाले. भाविकांची प्रचंड गर्दी होती; परंतु अंगारकी चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासनाची आढावा बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात झाली होती. बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार , पोलिस निरीक्षक, संस्थानचे सरपंच, पंच सहकारी, मुख्य पुजारी व सहकारी गणपतीपुळे सरपंच, विविध यंत्रणांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी केलेल्या नेटक्या नियोजनामुळे सर्व भाविकांना गणेशाचे व्यवस्थित दर्शन घडत होते. रांग काही संपत नव्हती. दुपारी दोन ते अडीचपर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. अखेर तीननंतर ही रांग संपली आणि दुपारी साडेतीन वाजता पालखी सोहळा झाला.
मंदिरासह किनाऱ्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यातून येणाऱ्या भाविकांना खोल समुद्रात जाण्यास मज्जाव केला जात होता. पर्यटकांनीही सहकार्य केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. देवस्थानच्या यंत्रणेनुसार दिवसभरात राज्यातून सुमारे ५५ हजाराच्यावर भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा केला आहे. या वर्षातील ही पर्वणी असल्याने अनेक गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.