रत्नागिरी:- रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले याने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेवर आपली छाप सोडली. बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या या राज्य ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये ५० मीटर रायफल पुरुष नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले याने सुवर्ण पदक कमावत रत्नागिरीचा झेंडा फडकवला.
पुरुषांच्या ५० मीटर प्रोन स्पर्धेत, रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवलेने सहा मालिकेनंतर एकूण ६२१.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. आता पर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर ह्या जिल्ह्याचे वर्चस्व असणाऱ्या खेळात रत्नागिरीच्या सुपुत्राने पहिल्यांदाच कोल्हापूरच्या इंद्रजित मोहितेचा ४ गुणांनी पराभव केला. इंद्रजितला एकूण ६१८ गुणांसह रौप्य पदक तर पुण्याच्या अभिजितसिंह यांनी एकूण ६१२.९ गुणांसह कांस्यपदक पटकावले. पुष्कराज याच्या या यशाबद्दल समस्त रत्नागिरीकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वीही पुष्कराज याने नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण असोसिएशन कडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्याचे यश उल्लेखनीय ठरले आहे.
या स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये माजी विश्वविजेत्या तेजस्विनी सावंतने ६१८ गुणांसह शिस्तीवर आपली हुकूमत सिद्ध केली आणि मुंबईच्या दुसर्या स्थानावर असलेल्या भक्ती खामकरचा ४.५ गुणांच्या फरकाने पराभव केला. पुण्याच्या प्रणाली सूर्यवंशीने एकूण ६११.७ कांस्यपदक मिळवले.
तसेच तीन वेळा ऑलिंपियन अंजली भागवतने केवळ ६०३.८ गुण मिळवत सहाव्या स्थानावर राहिली.









