कायदा मोडून पर्ससीन मच्छीमारांकडून एलईडी लाईट वापरून मासेमारी

मत्स्य विभागाकडून डोळेझाक; पर्ससीन मासेमारी बंद करण्याची मागणी 

रत्नागिरी:- एलईडीच्या प्रकाश झोतात होणाऱ्या मासेमारीला केंद्र शासनाने बंदी घातली आहे. तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या सागरी हद्दीत एलईडी मासेमारीला उत आले आहे. मोठ-मोठी जनरेटर वापरून ही मासेमारी सुरू आहे. जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारांना कडून मोठ्या प्रमाणावर एलईडीचा लाईटचा वापर सुरू असून बिनधास्त होणाऱ्या या मासेमारीकडे मत्स्य आयुक्त कार्यालय डोळेझाक करत असल्याने पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससिननेट मच्छीमारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असून पर्ससीन नेट माचीमारी शंभर टक्के बंद करा अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.  

पर्ससिन मासेमारीचा अवधी संपायला अगदी आठ ते दहा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे या नौकांद्वारे अक्षरशः मासेमारीची लुट सुरू झाली आहे. जिल्ह्यातील तवसाळ, रत्नागिरी, जयगड आदी भागात ही बेकायदेशीर एलईडीद्वारे मासेमारी सुरू आहे. या बेकादेशीर मासेमारीला लगाम घालण्यात मत्स्य व्यवसाय विभागाला पुरते अपयश आले आहे. मत्स्य विभागाच्या अगदी जवळपास ही मासेमारी केली जाते. कोणाच्या आशिर्वादाने ही मासेमारी चालते, हे सांगायची गरज नाही, असे  पारंपरिक मच्छीमारांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या एलईडीसाठी जनरेटरची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी मच्छीमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे जनरेटर रात्रीच्या वेळेस नौकांवर चढविण्यात येत आहेत. त्याचा स्थानिकांना फारच त्रास होत आहे. अनेकदा स्थानिकांना दमदाटी करण्यात येत असल्याचे समजते. तवसाळ हे एक पर्यटन क्षेत्र

आहे. पर्यटकांना चढ-उतार करण्यासाठी येथे जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टीवरून तवसाळ ते जयगड फेरीबोट चालते. परंतु अरुंद रस्ता असल्याने या मार्गावरूनच जनरेटर ने आण केले जाते. त्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. याचा स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन येथून सुटणारी फेरीबोट बंद करण्यात आल्याची समजते. फेरीबोटीसाठी दुसरी जेट्टी बांधण्यात आली. आता केवळ पर्यटकांना फिरण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येतो.

जिल्ह्यात एलईडीने मच्छीमारी बंदी असतानाही आता रात्री-अपरात्री एलईडीने मच्छीमारीसाठी लागणारे जनरेटर चढविण्यात येतात. सिंगल वाहन जाऊ शकणाऱ्या रस्त्यातून जनरेटर चढविण्यासाठी आवश्यक असलेले हायड्रोलीक (क्रेन) आणली जाते. कोणतीही तमा आणि कायद्याला न जुमानता बिनधिक्कत ही बेकायदेशीर मासेमारी सुरू झाली आहे. पारंपरिक मच्छीमारांचा याला पुर्वीपण विरोध होता आणि आजही आहे. ही बेकायदेशीर मासेमारी थांबली नाही, तर परंपरिक मच्छीमार विरुद्ध पर्ससिन मासेमारी असा, वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने वेळीच याला आळा घालावा, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.