रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात चुरस आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपशी युती करतानाच ग्रामविकास पॅनलला पाठबळ देण्यावर भर दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यादृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाकडे जबाबदार देण्यात आल्या असून जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे जबाबदार दिल्या आहेत. 29 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. निवळी, निरुळ, वेळवंड, सत्कोंडी, बोंडये, करबुडे या सहा ठिकाणी सरपंच बिनविरोध झाला आहे. यावर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीकडून दावा करण्यात आला आहे. सदस्यांसाठी 355 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने गावविकास पॅनेलशी जुळवून घेण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. जिथे ताकद कमी आहे, अशा ठिकाणी भाजपची मदत घेण्यात येत आहे. शिवसेनेत फाटाफुट झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तळागाळातील कार्यकर्ता आपलासा करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून नियोजन केले जात आहे.









