रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी भागवण्यासाठी शासनाकडून आलेले पैसेही अन्यत्र खर्च झाल्याने पालिकेच्या १३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २ कोटी रुपये पालिकेकडे थकले आहेत. ग्रॅच्युइटीचे पैसे, पगार रोखीकरणाच्या (अर्जित रजाविक्री) पैशाचा यामध्ये समावेश आहे. महिनाभरात २ कोटी थकित रक्कम न मिळाल्यास संतप्त निवृत्त कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षभरात पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १३ कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांच्या ग्रॅच्युइटीचे पैसे मिळालेले नाहीत तसेच त्यांना पगार रोखीकरणही (अर्जित रजाविक्री) करता आलेले नाही. कर्मचाऱ्यांचे हे पैसे देण्यात का विलंब होत आहे, असा सवाल केला जात आहे. हे पैसे मिळावेत यासाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.
सुधारित पाणीपुरवठा योजनेसह अनेक कामांवर पालिकेला अतिरिक्त खर्च करावा लागला. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शहराअंतर्गत कामांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्यासाठी निधीची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान पलिकेसमोर आहे. शासनाच्या विविध योजनांच्या तांत्रिक मंजुरीसाठी (टीएस) काही टक्के रक्कम आणि योजनेच्या एकूण खर्चातील ९ ते १० टक्के भरावी लागणारी रक्कम, सुधारित पाणीयोजनेवरील करोडो रुपयांचा अतिरिक्त खर्च यामुळे पालिकेचा स्वनिधी गेल्या वर्षभरात संपुष्टात आला आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुरुस्तीवर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचा परिणाम नवीन विकासकामांवर होत आहे. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्यासाठी नगर पालिकेकडे पैसेच नसल्याचे सांगून त्यांना सातत्याने झुलवत ठेवल्यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या फायद्यासाठी या कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली.









