रत्नागिरी:- चाफेरी ग्रामपंचायत तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमध्ये उजवी दिसेल असे काम मागील पाच वर्षाच्या कालावधीत हाती घेण्यात आले आहे. गावात दर्जेदार रस्ते, पाखाड्या, स्ट्रीटलाईट, सुसज्ज शाळा उभारण्यात आली आहे. पाच वर्षात झालेला विकास हाच आमच्या प्रचाराचा अजेंडा असून केवळ विकासकामांच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. विरोधकांकडे प्रचाराचा मुद्दाच शिल्लक नाही. यामुळे केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता आम्हालाच मतदान करेल आणि मतदानानंतर चाफेरी ग्रामपंचायतीवर आदित्येश्वर गाव विकास पॅनेलचीच एकतर्फी सत्ता येईल असा विश्वास चाफेरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश चौगुले यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. यात चाफेरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा समावेश आहे. चाफेरी ग्रामपंचायत निवडणुकीत आदित्येश्वर गाव विकास पॅनेलने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सात सदस्यांपैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित पाच सदस्य आणि थेट सरपंच देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास माजी सरपंच चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
सरपंच पदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत चाफेरी गावात पायाभूत आणि मूलभूत विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आल्याचे चौघुले यांनी सांगितले. मागील पाच वर्षात वाडीतील प्रत्येक घरापर्यंत स्ट्रीट लाईट नेण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी पाखाड्या उभारण्यात आल्या. तसेच ज्या ठिकाणी मागणी होती त्या ठिकाणी प्राधान्याने सवरक्षक भिंती उभारण्यात आल्या. चाफेरीतील गुरववाडी येथे तीन सवरक्षक भिंती उभारण्यात आल्या. गुरव वाडी, बौध्द वाडीत देखील गरजेच्या ठिकाणी तत्काळ सवरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. गावात विकासकामे करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कामे करण्यात आल्याचे माजी सरपंच चौगुले यांनी सांगितले.
गावातील प्रत्येक घराघरात पाणी ही योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी १ कोटी २७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी कळझोंडी धरणावरून गावात नळपाणी योजना कार्यान्वित आहे. आता नव्या पाइपलाइनसाठी सव्वा कोटी निधी प्राप्त झाला असून भविष्यात प्रत्येक घरात मुबलक पाणी पोहचेल. चाफेरी फाटा ते गावात येणाऱ्या रस्त्यासाठी देखील १५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. लवकरच हा रस्ता देखील पूर्णत्वास जाईल. पाच वर्षात गावात अंतर्गत रस्ते आणि इतर अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास नेण्यात आल्याचे महेश चौगुले यांनी सांगितले.
येणाऱ्या कालावधीत गावातील बचतगटांना उभारी देताना त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या निधीची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामपंचायतीमध्ये फलक लावण्यात येईल. सर्वसामान्य ग्रामस्थांना आरोग्य आणि शैक्षणिक सेवा या दर्जेदार आणि तत्परतेने देण्यावर भर राहील असे त्यांनी सांगितले.
गावात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुण आणि युवा वर्ग देखील कार्यरत आहे. पुढील काळात वयोवृद्ध आणि विधवा महिलांसाठी ग्रामपचायती मार्फत घरपोच दाखले आणि इतर सेवा देण्याचा निश्चय असल्याचे चौगुले यांनी सांगितले. अशा व्यक्तींनी ग्रामपंचायतीकडे कामासाठी संपर्क करावा ग्रामपंचायतकडून या व्यक्तींना घरी जाऊन सेवा दिली जाईल. याशिवाय अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून तालुक्यात चाफेरी ग्रामपंचायत उजवी असल्याचे दाखवून देऊ असे चौगुले यांनी सांगितले. निवडणूक लढवताना आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत असून विरोधकांकडे प्रचाराचा मुद्दा नसल्याने उगाच आरोप करत असून आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास चौगुले यांनी व्यक्त केला.