रत्नागिरी:- संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे जतन केलेल्या कापडगाव या गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एक कोटी २६ लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून भव्य स्मारक, बुद्ध विहार व अन्य वास्तू उभारण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी या गावात ६६ वर्ष जतन केल्या आहेत.
’ऐतिहासिक स्थळ’ म्हणून विकसित होणार्या कापडगावला समता पर्वाच्या निमित्ताने सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. संविधान दिनापासून राज्यभर राबविण्यात येणार्या समता पर्वाच्या सातव्या दिवशी दलित वस्तीमध्ये संवादासाठी रत्नागिरीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवणार्या रत्नागिरी तालुक्यातील कापडगावला भेट दिली. ऐतिहासिक स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल एक कोटी २६ लाख रुपये मंजूर केले आहेत. यावेळी कापडगावचे सरपंच विद्येश कोत्रे, बौद्धजन हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शांताराम कोत्रे, कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर पाली -पाथरट संस्थेचे संचालक संतोष आयरे, विजाभज आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, समाज कल्याण कार्यालय रत्नागिरीचे संतोष खेडेकर, रितेश सोनवणे, हेरिटेज संस्थेचे संस्थाप्रमुख संतोष कांबळे तसेच ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. या विहारातील एका कक्षात वाचनालयाचे प्रयोजन असून, ते मंजूर करावे, अशी मागणी सरपंच विद्येश कोत्रे यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. कापडगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे जतन गावात भक्तिभावाने केले जात आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने येथे बुद्धविहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारले असून त्यात हा चांदीचा अस्थिकलश ठेवला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून या ठिकाणी नीधी मधून मंजूर केला आहे. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. यात तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली असून, त्यासमोर बाबासाहेबांच्या अस्थींचा चांदीचा कलश ठेवण्यात आला आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचा अस्थिकलश श्री. कांबळे यांनी कापडगाव बौद्धवाडी येथे आणला होता.









