यंदाच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या एकमेकांवरील कुरघोड्याविना 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पोर्टलवर भरलेल्या माहितीमधील चुका दुरुस्तीसाठी दहा जणांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे अपील केले होते; मात्र यंदाच्या प्रक्रियेत एकमेकांवर आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही शिक्षकांने अर्ज केलेला नव्हता.

शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु असून शिक्षणाधिकार्‍यांकडे अपीलावर सुनावणीसाठी ६ डिसेंबरपर्यंत मुदत होती. बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र ठरलेल्या यादीतील सुमारे पावणेतीन हजार शिक्षकांपैकी १० जणांनी अपील केले होते. त्यातील दोघांचे अर्ज नामंजूर करण्यात आले तर आठ अर्जांवर सुनावणी झाली. सुनावणी घेण्यात आलेल्या अर्जांमध्ये शिक्षकांची वैयक्तिक दुरुस्त्यांसदर्भात सुचना होत्या. काही ठिकाणी शिक्षक म्हणून सलग क्षेत्रात केलेली कामगिरीची तारीख चुकीची भरली गेली होती. ती बदलून घेणे यासह अन्य माहिती दुरुस्तीसाठीचे आक्षेप होते. मात्र एका शिक्षकाकडून दुसर्‍या शिक्षकावर चुकीची माहिती भरल्यामुळे आक्षेप घेतल्याचा अर्ज कुणीही दाखल केलेला नव्हता. गेल्या काही दिवसात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून विशेष कक्ष सुरु केला होता. त्यासाठी कर्मचारी नियुक्त केला होता. शिक्षकांची सविस्तर माहितीची पडताळणी करुन भरली गेल्यामुळे आक्षेपाचा प्रश्‍नच उरला नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यातअ आले. तसेच अपील नामंजुर केलेल्या अर्जांमध्ये पोर्टलवरील माहिती दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यातील एका शिक्षकाने बदली प्रक्रियेतून माघार घेण्यासाठीची मागणी केली होती. बदली अधिकार पात्र असलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात काम केल्यामुळे बदली प्रक्रियेत सुट मिळते. संंबंधित शिक्षकाकडून बदलीसाठी होकार दर्शविला होता. आक्षेपांवर सुनावणी प्रक्रिया झाली असून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अपील नोंदवण्यासाठीची मुदत आणि सुनावणी प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

अपील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर बदली पात्र, बदली अधिकार पात्र, विशेष संवर्ग १, विशेष संवर्ग २ यांची १९ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. तसेच २० डिसेंबरपासून संवर्ग १ मधील समाविष्ट शिक्षकांना बदलीसाठी शाळांची नाव भरण्यास सुरवात होणार आहे. विकल्पामध्ये तिस शाळांची नावे भरावयाची आहेत.