बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण रत्नागिरीकरांच्या पसंतीला
रत्नागिरी:- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने रत्नागिरीतील पुतळ्याचे करण्यात आलेले सुशोभिकरण समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागील बाजुला उभारण्यात आलेल्या भिंतीवर बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांना म्युरलच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील चौकांमध्ये असणारे आयलॅण्ड सुशोभित करण्याच्या दृष्टीने राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले होते. मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती उभारण्यात आलेली शिवसृष्टी रत्नागिरीकरांसह येणार्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण सुरु करण्यात आले होते. या पुतळ्याभोवती काळ्या दगडाची संरक्षक रचना तयार करण्यात आली होती. मागील बाजुने भिंतीची उंचीही वाढवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी होणार्या सुशोभिकरणाबद्दल शहरवासियांना औत्स्युक्य होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीवासिय या ठिकाणी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाच्या पाच क्षणांना म्युरलच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचे काम सुरु होते. मुंबईतील जे.जे. आर्टस कॉलेजचे प्राध्यापक शशिकांत काकडे व प्रा. विजय बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी आंबादास जाधव, स्वप्नील कदम आणि महाविद्यालयातील 18 ते 20 विद्यार्थी म्युरल तयार करण्यासाठी झटत होते. पुतळ्याच्या आतील बाजुच्या भिंतीवर गोलमेज परिषद आणि नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह तर बाहेरील बाजुच्या भिंतीवर चवदार तळे आंदोलन, संविधानाचे हस्तांतरीकरण आणि नागपूर येथील दिक्षाभूमीवरील प्रसंग चित्तारण्यात आले आहेत. पुतळ्यासमोर शांती स्तूप येथील कमानीचा साज चढवण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्वच नागरिकांनी या कामाचे कौतुक केले. रात्रीच्यावेळी ही म्युरल आकर्षक दिसण्यासाठी याठिकाणी प्रकाशही सोडण्यात आला आहे.