शालेय पोषण आहार आता प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान

रत्नागिरी:- शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान असे करण्यात आले आहे. आहारासाठीच्या अनुदानाच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली असून अन्न शिजवण्यासाठी दरवाढ केली आहे.

पोषण आहार योजनेला ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आहार शिजवण्यासाठी लागणारे गॅस, किराणा साहित्य तसेच भाजीपाला दरवाढ वारंवार होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या खिशाला चांगलीच फोडणी बसत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजवण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे अन्न शिजवण्याच्या दरासाठी आहार खर्च प्राथिमिकसाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिन ४ रुपये ९७ पैसे आणि उच्च प्राथिमिक वर्गासाठी ७ रूपये ४५ पैसे दर निश्चित केला आहे. आता केंद्राच्या ७ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता १ ऑक्टोबर २०२२ पासून अन्न शिजवण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार प्रति विद्यार्थी, प्रतिदिन याकरता प्राथिमिक वर्गासाठी ५ रुपये ४५ पैसे आणि उच्च प्राथिमिक वर्गासाठी ८ रुपये १७ पैसे हा सुधारित दर ठरवण्यात आला आहे. इंधन आणि भाजीपाल्यासाठी मिळणार्‍या अनुदानात काही प्रमाणात वाढ केली आहे. खाद्य तेल, आणि इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे योजनेत वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत स्वयपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. तुटपुंज्या प्रमाणात मानधन मिळत असल्याने खिचडी शिजवण्याच्या कामासाठी कोणीही तयार होत नाही.