रत्नागिरी:- पुढील चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही भात खरेदीवर बोनस रक्कम जाहीर झालेला नसल्याने शेतकर्यांतून नाराजी आहे. दरम्यान, यंदा भात खरेदीची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 50 रूपयांनी वाढविली असली तरी शेतकर्यांतून बोनस जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
भात उत्पादक शेतकर्यांना भात खरेदीवर दरवर्षी 500 ते 700 रूपये असा प्रतिक्विंटल मागे बोनस दर शासनाकडून दिला जात होता. दोनवर्षापूर्वी भात उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल 700 रूपये बोनस दर जाहीर केला. मात्र बोनस शेतकर्यांना मिळालाच नाही. त्यानंतर गतवर्षी बोनसची घोषणाही झालेली नाही. तसेच यंदाही बोनसबाबत शासनाकडून घोषणा झालेली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 55 हजार 945 भात उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकर्यांकडून गतवर्षी 1 हजार 990 रुपये क्विंटल या दराने भात खरेदी मात्र केली गेली. या शेतकर्यांना प्रतिक्विंटल 700 रूपये बोनस जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बोनस मिळाला नाही. यंदा भात खरेदीसाठी 2 हजार 40 रूपये असा खरेदीचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र भात खरेदीवर बोनस देण्याबाबत शासनाकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही शेतकर्यांना अल्प दरात भात विक्री करावी लागणार आहे.
गतवर्षी 35 हजार 915 शेतकर्यांकडून 1 लाख 90 हजार 551 क्विंटल भाताची खरेदी शासनाकडून झाली होती. जिल्ह्यातील 28 भात खरेदी केंद्रांवरून ही भात खरेदी केली गेली. यंदाही दिडलाख क्विंटल भात खरेदी होण्याची अपेक्षा आहे. मात्र बोनस रक्कम जाहीर न झाल्याने शेतकर्यांना भाताचा दर कमी मिळणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील भात केंद्रांवर 3 हजार 434 शेतकर्यांनी भात विक्री करीता नोंदणी केली आहे. येत्या चार दिवसात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
शासनाकडून जानेवारी महिन्यापर्यंत भात खरेदी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंदा 30 नोव्हेंबर पर्यंत भात खरेदी केंद्रांवर शेतकर्यांना भात विक्री करता नोंदणी करता येणार आहे. ही नाव नोंदणी करण्याचेही आवाहन खरेदी विक्री संघातर्फे करण्यात आले
आहे.