खेड:- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील डीव्हाइन कंपनीमध्ये स्फोट होऊन ७ कामगार जखमी तर एका कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनी मालकासह अन्य दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मालक श्रीमती अनुराधा मौर्य, रा. मुंबई, यांच्यासह लोटे येथील कंपनीचे कामकाज पहाणारे पियुष मौर्य, रा. मुंबई, वेल्डिंग वर्क मुकादम दीपक गंगाराम महाडिक, रा. घाणेखुंट या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगचे काम करत असताना त्यातून उडालेल्या ठिणगी मधून केमिकलचा संपर्क झाल्याने स्फोट होऊन ८ कामगार होरपळले. यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांवर भादविक ३०४ ( अ ), ३३७, ३३८, २८५, २८६, २८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत.