आरेवारेत कोल्हापूरमधील विद्यार्थी बुडाला; स्थानिकांनी वाचवला जीव

रत्नागिरी:- कोल्हापूर उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या 100 मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा आरे-वारे समुद्रात बुडाला.  स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.  प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूर  येथे हलविण्यात आले आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. 

कोल्हापूर उजगाव येथील एका शाळेची सहल रत्नागिरीत आली होती. शिक्षक १०० मुलांना घेऊन   रत्नागिरीत आले होते . दुपारी एक वाजता सर्वजण आरे वारे समुद्रकिनारी पोचले तेथे गेल्यानंतर मुले मौज मजा करण्यासाठी आरे वारे समुद्रात उतरली होती.  बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर (वय 13)  हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यानंतर सोबत असलेल्या मुलासह शिक्षकांनी  आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्र जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर आदित्यला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.