घरातील कर्ता व्यक्ती गेलेल्या ४० कुटुंबांना लाखोंची मदत

केंद्राची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना; प्रत्येकी मिळतात २० हजार

रत्नागिरी:– केंद्र शासनाची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना गरीब कुटुंबांना मोठा आधार ठरत आहे. घरातील कुटुंबप्रमुख किंवा कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास या योजनेतून त्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपये मिळतात. गेल्या सात महिन्यात जिल्ह्यातील ४० कुटुंबीयांना ८ लाखाची मदत या योजनेतून देण्यात आली आहे.

कुटुंब लाभ अर्थसाहाय्य योजना ही केंद्र सरकारकडून राबवण्यात येते. या योजनेंतर्गत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची मदत दिली जाते, अशी ही योजना आहे; मात्र त्यामध्ये काही निकष असून ती व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे अनिवार्य आहे. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला ही २० हजाराचे अर्थसाहाय्य देण्यात येते. ही मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अथवा तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज करता येतो. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४० कुटुंबांच्या कर्त्याचा मृत्यू झाल्याने या ४० कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयांची एकरकमी मदत देण्यात आली. गेल्या सात महिन्यात शासनाकडून ८ लाख रुपये वितरित करण्यात आले.
केंद्र सरकारची योजना चांगली असली तरी मदत मिळण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे ही मदत मिळणे गरिबांना अवघड होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील व्यक्तीचे निधन झाल्यास मदतीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशांचे अर्ज तलाठी किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुकास्तरावर जाणे गरजेचे असते. ते अर्ज जात नसल्याने दिसते. त्यासाठी या योजनेची ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.