मिरकरवाडा येथील स्वच्छतागृहाची दुर्दशा; घंटागाडीच्या वेळेतही बदल

रनप प्रशासन नागरिकांच्या संयमाचा अंत पाहत आहे – सोहेल साखरकर

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील विकास जवळपास ठप्प असल्याचे चित्र आहे. आधी पाणी योजनेचे काम रखडले आणि आता स्वच्छतेच्या बाबतीत रनप प्रशासन मिरकरवाडा भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी केला आहे. २०१० साली वाढलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था पूर्णतः दयनीय असून कचरा गोळा करण्यासाठी येणारी गाडी देखील अवेळी येत आहे.

मिरकरवाडा नेहमीच विकासकामांच्या बाबतीत दुर्लक्षित ठेवण्यात आला. आ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली येथील विकासकामाना गती देण्यात आली. मात्र, याला रनप प्रशासनना कडून आवश्यक सहकार्य भेटत नसल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे. सुधारित नळपाणी योजना अद्यापही मिरकरवाडा भागात पूर्ण करण्यात आलेली नाही. रनप प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील समन्वय नसल्याने मिरकरवाडा भागात अद्यापही योजनेचे काम पूर्णत्वास गेले असल्याचे साखरकर यांचे म्हणणे आहे. मुख्याधिकारी केवळ आश्वासन देत असून पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान आता मिरकरवाडा शाळे समोर स्वच्छता गृह उभारण्यात आले होते. २०१० साली उभारण्यात आलेल्या या स्वच्छता गृहाची वापराविना दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपये खर्चून २०१० साली या स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली मात्र देखभाली उभावी त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. स्वच्छ आणि सुदंर रत्नागिरीची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या समिती पासून हे स्वछालय नेहमीच लपवून ठेवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या भागात याआधी कचरा गोळा करणारी गाडी सकाळी सात वाजता दाखल होत होती मात्र प्रशासक येताच कचरा नेण्यासाठी येणारी गाडी आता बारा नंतर मिरकरवाडा येथे येत आहे. यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा येथील नागरिकांचा संयम सुटेल असा इशारा माजी नगरसेवक साखरकर यांनी दिला आहे.