जिल्ह्यात लवकरच उभे राहणार महिला भवन

रत्नागिरी:- महिला व बालविकास संबंधित सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी भवन मंजूर झाले असून याचे नाव महिला भवन असे असणार आहे. यासाठी सर्व प्रकिया पूर्ण झाली असून केवळ जागा अंतिम करणे बाकी असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागाने दिली.

मुळात महिला व बालविकास संबंधित प्रमुख मुख्यालय कार्यालय रत्नागिरी शहरात आहेत, ही सर्व कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांना उत्तम सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महिला भवन साठी मध्यवर्ती ठिकाणी जागा अंतिम करायचे असून योग्य जागा जिल्हा महिला बालविकास विभागाकडून शोधण्यात येत आहे, ही जागा अंतिम झाल्यावर हा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले जाणार आहे. यानंतर लगेच या महिला भवनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या महिला भवनच्या निर्मितीमुळे जिल्ह्यात एक आगळंवेगळं अस भवन सेवेत सुरू होईल. कोणत्याही कामासाठी महिलांना दहा ठिकाणी फेर्‍या मारू लागू नये, एकाच छताखाली सगळ्या सेवा त्यांना मिळाव्यात यासाठीच हे महिला भवन होणार आहे.