दिवाळी

-आनंद तापेकर

या दिवाळीला ऋतूबदलाची चाहूल मिळालीच नाही. वादळे व त्यामुळे निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे रोजच अवकाळी पाऊस पडत आहे. पावसाळी वातावरणातच दिवाळीचे आगमन झाले. ढगाळ वातावरणात आला तरीही दिपोत्सवाचा हा सण लोकांच्या मनात उमंग करुन जातो. खेड्यात पीक काढणीनंतर आणि शहरात चाकरमान्यांच्या सुट्टीत दिवाळीची अपूर्वाई केली जाते.

दिवाळी हा एक गंधाचा प्रवास आहे. नवीन रंग, कपडे, पदार्थ, फटाके यांचा वास आला की, आपल्याला दिवाळी आल्याची जाणीव होते. दरवर्षी दिवाळीच्या अगोदर 15 दिवस घराघरांत रंगरंगोटी सुरू होते. ओल्या चुन्याचा किंवा ऑईलपेंटचा वास आला की दिवाळीची सलामी झाल्यासारखी वाटते. अंगणात सडामार्जनाला सुरुवात होते. त्या ओल्या सड्याचा गंधही नाकाला सुखवायचा. पण अलिकडे अंगण काँक्रिटचे झाल्याने तो ‘फिल’ नाहिसा झाला आहे. रोज घरात होणा-या एकेका फराळाच्या पदार्थाचा घरभर दरवळणारा गंध, उटणं, सुगंधी तेल, फटाक्यांचा गंध असा सगळ्यांचा मिळून दिवाळीचा गंधप्रवास असतो. मग स्पर्श, रूप, रस, गंध आणि नाद या पाचही जाणिवांनी दिवाळी उजळून जाते. नव्या कपड्यांचा मुलायम स्पर्श, फराळाच्या स्वादांचा रस, दिव्यांच्या रोषणाईचं रूप आणि फटाक्यांच्या आवाजांचा नाद अशी पाचही ज्ञानेंद्रिय दिवाळीत गुंतायची.

दिवाळी म्हटलं की, आकाशकंदील, पणत्या करणे हे आनंदसोहळे आधीच सुरू व्हायचे. चमचम करणारे जिलेटीनचे पिवळे- लाल कागद आणून बांबूच्या पट्टयांना आकार देवून आकाशदिवा करणे, त्याला कागद चिकटवणं हा सगळा आनंदाचा एक भाग आहे. काही दशकापूर्वी आकाशकंदील हा तार्कीक अर्थाने कंदीलच असायचा. त्यात पणती ठेवली जायची. दिवाळीच्या पाचही दिवस आकाशकंदील खाली उत्तरवून त्यात तेलाने भरलेली पणती ठेवून तो आकाशकंदील परत घरावर चढवला जायचा, असा सगळा आनंदाचा सोपस्कर असायचा. तो रम्य देखावा अगोदरच्या पिढ्यांनी अनुभवला आहे. अलिकडच्या काळात इलेक्ट्रिक बल्बमुळे आकाशदिवा झाला आहे. वेगवेगळया रंगांच्या बल्बमुळे आपल्या घरावरचा आकाशदिवा दुरून पाहणे रोमांचक असते.
फटाके आणणे किंवा फक्त फटाके आणण्याच्या विचारानेच मनात उत्साह यायचा. घरातून मिळालेल्या नेमक्या पैशांत जास्तीत जास्त प्रकारचे फटाके घेण्यासाठी मित्रांसोबत काथ्याकूट केला जायचा. त्यानंतर पाच दिवस फटाचे पुरवण्यासाठी त्या फटाक्यांची पाच भागात विभागणी केली जायची, लक्ष्मीपूजनाच्यावेळी वाजवायचा फटाके वेगळा, नरक चतुर्दशी दिवशी वाजवायचे फटाके वेगळे अशी पूर्वनियोजित योजना केली जायचे. किशोरवयात आल्यावर दिवाळी अंकाने दिवाळीच्या आनंदात भर टाकली. मराठी माणसांच्या दिवाळीचं हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या कुठल्याही भाषेत असे दिवाळी अंक निघत नाहीत. मराठीतला पहिला दिवाळी अंक 115 वर्षांपूर्वी निघाला होता. शतकापूर्वी मराठी संपादकाला असा दिवाळी अंक काढण्याची कल्पना सुचावी ही मराठी म्हणून आपल्याला अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

पूर्वी खेडेगावात नरकचतुर्दशीला दिवाळीच्या वातावरण निर्मितीसाठी घरासमोर वाजंत्री येत. थोडावेळ वाद्य वाजवल्यानंतर धान्य, पैसे या स्वरूपात मोबदला घेऊन ग्रामपरिक्रमा केले जायची. काळाच्या ओघात दिवाळीच्या सणातून हा भागही वगळला गेला. दिवाळीचा सण हा फक्त पाचच दिवसांचा न राहता 15-20 दिवसांचा होता. घराची रंगरंगोटी, घरासमोर सडामार्जन, रांगोळ्या, नवीन कपडे खरेदी करून ते शिवण्यासाठी शिंप्याकडे चार- पाच फेऱ्या मारणे मग शिंप्याने दिवाळीच्या आदल्या दिवशीच ते नवीन शिवलेले कपडे देणे. फराळाचे रोज नवीन पदार्थ तयार करणे, आकाशकंदील बनवणे या सर्वांची मिळून दिवाळी असायची.

अलिकडे रेडिमेडच्या जमान्यात दिवाळी सण ‘आल्टर’ होवून दोन- तीन दिवसांचा झाला आहे . लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे दिवाळी असा समज आता रुढ होत आहे. दिवाळीची सुट्टी बाहेर फिरायला जाण्यासाठी असते अशी भावना लोकांत रुजली आहे. सगळ्या कुटुंबाला, नातेवाईकांना, समाजाला एकत्र आणणारा हा सण असतो याचा विसर लोकांना पडला आहे. आपण रोज ज्यांच्यासोबत जगतो त्यांच्याशी सणामुळे भावबंध निर्माण केला जातो. दिव्यांबरोबरच स्नेहाचा, मांगल्याचा, आनंदाचा प्रचार करण्याचा हा सण आहे . दिवाळीतील उजळणा-या पणतीतून संस्कार, प्रेम पसरत राहो हीच अपेक्षा व शुभेच्छा .