जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान

रत्नागिरी:-जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान झाले असून, ग्रामीण भागाचा कौल कोणत्या गटांना मिळणार याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागून राहिले आहे. गावागावातील कारभारी कोण याचा फैसला आज सकाळी होणार आहे.

जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. जिल्ह्यात प्रथमच चिपळूण तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात ग्रामीण भागातील लोकांना यश आले आहे. पक्षीय मतभेद बाजुला टाकून गाव विकासासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

उर्वरीत 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. विशेषत: ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट अशी लढत होताना दिसत आहे. पक्षिय चिन्हांचा वापर नसला तरी ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी उत्सुक असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सकाळी दहा वाजल्या नंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. 

जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरानंतर अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. त्यामुळे सायंकाळनंतर मतदानात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून गावागावांतील कारभारी कोण हे स्पष्ट होणार आहे.