डाटा एन्ट्री ऑपरेटरचे चार महिन्याच्या मानधनापोटीची एक कोटी चाळीस लाखांची रक्कम थकीत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार केंद्रांतर्गत काम करणार्‍या सुमारे सव्वा पाचशे डाटा एन्ट्री ऑपरेटरचे चार महिन्याच्या मानधनापोटीची सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयांची रक्कम थकली आहे. महिन्याला सात हजार रुपये मानधन दिले जात असून त्यासाठीही या कंत्राटी कर्मचार्‍यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. गणेशोत्सव झाला, दसराही गेला आता दिवाळी तरी सुखाची जाणार का असा प्रश्‍न मानधन रखडलेल्या तरुणाईकडून व्यक्त केला जात आहे..

विविध प्रकारचे दाखले, ऑनलाईन नोंदणी यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार केंद्र निर्माण करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात ५०२ केंद्र कार्यान्वित आहेत. यामध्ये सुमारे ५३८ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. हे केंद्र सुरु करणार्‍या ग्रामपंचायतीला दर महिना १२ हजार ३३१ रुपये राज्य शासनाच्या आपले सरकार केंद्राकडे वर्ग करावे लागतात. ही रक ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेला, त्यांच्याकडून ती पुढे दिली जाते. त्यामधील ७ हजार रुपये केंद्रामध्ये काम करणार्‍यांना दिले जातात. गावातच रोजगार मिळावा यासाठी अनेक तरुण-तरुणी या केंद्रात काम करत आहेत. गणेशोत्सव झाला, दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरीही आपले सरकार केंद्रामध्ये काम करणार्‍या या लोकांची शासनाकडून थट्टा केली जात आहे. मानधन वेळेत मिळावे अशी मागणी डाटा एन्ट्री ऑपरेटरकडून केली जात होती; परंतु गेले चार महिने त्यांचे मानधनच दिलेे गेलेले नाही. पंधरा दिवसांनी दिवाळी सण साजरा होणार आहे, त्यावेळी तरी मानधन मिळावे असे कंत्राटी कर्मचार्‍यांकडून सांगितले जात आहे. याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनी राज्यातील सर्व केंद्रातील लोकांना एकाचवेळी मानधन वर्ग करते. रत्नागिरी जिल्हापरिषदेने सर्व केंद्रांकडील रक्कम वेळेत जमा केली आहे. अन्य काही जिल्ह्यांकडून रक्कम जमा केलेली नसल्याने कर्मचार्‍यांना मानधन दिलेले नाही.