उपरत्या वार्‍यामुळे मासळी किनारपट्टीकडे

५० ते १०० टब मासे; बंपर मासळीची अजुनही प्रतिक्षाच

रत्नागिरी:- परतीच्या पावसाला आरंभ झाला असून वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागले आहेत. बदलत्या वातावरणामुळे खोल समुद्रातील मासे किनारपट्टीकडे येऊ लागले आहेत. हा मासा पकडण्यासाठी मच्छीमारांची कसरत सुरु झाली आहे. काळबादेवी, भाट्ये, गणपतीपुळे, जयगड, नाटे परिसरात नौका दिसू लागल्या आहेत. या कालावधीत नऊ प्रकारचे मासे सापडत असले तरीही अपेक्षित दराची अजुनही मच्छीमारांना प्रतिक्षाच आहे.

यंदाच्या हंगामात थोड्या-थोड्या कालावधीत वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने मच्छीमारीत अडथळा निर्माण होत होता. मागील आठवड्यात खोल समुद्रात वादळ होते. समुद्रही खवळलेला होता. ते सरल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरवात झाली असून किनारपट्टी भागात वारेही वाहत आहेत. पाण्याला करंट असून गिलनेटने मासेमारी करणार्‍यांना त्याचा फटका बसलेला आहे. सध्या वाहणार्‍या उपरत्या वार्‍यांमुळे मासळी बदलत्या प्रवाहांमुळे समुद्राकडून किनार्‍याकडे येऊ लागली आहे. परिणामी गेले आठवडाभर सर्वच मच्छीमारांनी त्यावर उड्या मारल्या आहेत. प्रवाहांमुळे विविध प्रकारची मासळी एकाच ठिकाणी सापडत आहे. नवरात्रीच्या कालावधीत प्रवाहांची दिशा ठरलेली असल्याने या कालावधीत नऊ प्रकारचे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतात. याचा फायदा ट्रॉलस्, पर्ससिननेटने मासेमारी करणार्‍यांना होत आहे. ५० ते १०० टब (३२ किलोचा एक टब) मासे मिळत आहेत. त्यात फिशमिलला दिला जाणारा बांगडी मासा मोठ्याप्रमाणात आहे. त्याचा दर १६ रुपये किलो इतकाच आहे. हा दर १८ ते २० रुपये मिळणे अपेक्षित आहे. यावरच मच्छीमारांना समाधान मानावे लागत आहे. मॉन्सून परतल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस खर्‍या अर्थाने मच्छीमारांच्या जाळ्यात बंपर मासळी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.