कोरोनानंतरच्या पहिल्या अंगारकी उत्सवासाठी गणपतीपुळे सज्ज 

रत्नागिरी:- कोरोनातील निर्बंध मुक्तीनंतर आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. १३) गणपतीपुळेत यात्रोत्सव होणार आहे. यावेळी पंचवीस हजाराहून अधिक भक्तगण पुळ्यात येतील असा अंदाज आहे. पावसाळी वातावरणामुळे गर्दी राहण्याची शक्यता आहे. भक्तांच्या स्वागतासाठी देवस्थान, ग्रामपंचायत आणि प्रशासन सज्ज झाले असुन दिडशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्र किनार्‍यावर राखीव पोलिस दलाची एक तुकडी, जीवरक्षक आणि सागरी सुरक्षा दलाची फायबर बोट तैनात केली आहे.

अंगारकी चतुर्थीसाठी गणपतीपुळेत सुविधांचे नियोजन करण्यासाठी देवस्थानच्या सभागृहात बैठक झाली होती. त्यानुसार दोन दिवस आधीपासून नियोजन सुरु आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील बहूसंख्य भाविक गणपतीपुळेत उपस्थिती लावतात. गणपतीपुळेतील स्वयंभू श्रीं चे मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले होईल. पहाटे मुख्य पुजार्‍यांच्या हस्ते पूजाअर्चा व आरती मंत्र पुष्प झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जाणार आहे. देवस्थान समितीने दर्शनासाठी मंदिर परिसरात पावसाची परिस्थिती पाहून दर्शन रांगांची व्यवस्था केली आहे. दर्शन रांगांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकले आहे. त्यामुळे पाऊस असला तरी भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. रांगांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. परजिल्ह्यातून खाजगी वाहने घेऊन येणार्‍यांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने परिसरात तिन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. मंदिराकडे येणार्‍या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तिठ्यावर बाजारपेठ भरते तिथे मोकळ्या जागेत, गणपतीपुळे एसटी स्टॅण्डजवळील जागेत गाड्या उभ्या करता येतील. विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यासाठी महावितरणचे अधिकारी दिवसभर उपस्थित राहतील.

मंदिरातील दर्शनानंतर भाविक समुद्रा चौपाटीवर फिरायला जातात. समुद्र खवळलेला असून विशिष्ठ ठिकाणी भरती-ओहटीला चाळ (खड्डा) तयार होत आहे. गेल्या पंधरा दिवसात तेथे पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यांना जीवरक्षकांनी वाचवले. धोकादायक भाग रेड झोन केला असला तरीही गर्दी प्रचंड असल्यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्र चौपाटीवर राखीव पोलीस दलाची तिस जणांची एक तुकडी तैनात केली आहे. ग्रामपंचायतीचे चार जीवरक्षक, पोलिस मित्र यांना पोलिसांनी सुचना दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यास बुडणार्‍यांना वाचवण्यासाठी सागरी सुरक्षा दलाची फायबर बोटही किनार्‍यावर ठेवण्यात आली आहे. पोलिसांची करड नजर पोहायला जाणार्‍यांवर राहणार आहे. गणपतीपुळे परिसरात १४ पोलिस अधिकारी आणि १४८ पोलीस कर्मचारी, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसही ठेवण्यात आले आहेत.