रत्नागिरीच्या दोन्ही राजांना वाजत-गाजत निरोप

रत्नागिरी:- रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाºया मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन्ही राजांच्याविसर्जन मिरवणुकांमध्ये रत्नागिरीकर मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. अगदी वाजत-गाजत अशी मिरवणुक काढून दोन्ही राजांचे रात्री उशिराने विसर्जन करण्यात आले.

ढोल, ताशे, बेंजो, झांज पथक आदी वाद्यांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतषबाजीत या मिरवणूका निघाल्या होत्या. आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजाच्या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत ना. सामंत यांच्यासह श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचे अभिजित गोडबोले, यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्ही मिरवणुकांना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. या दोन्ही राजांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी राजाची मिरवणुक रामआळीत तर श्री रत्नागिरीचा राजाची मिरवणुक एसटी स्टॅण्ड येथे होती. दोन्ही मिरवणुका फारच आकर्षक पद्धतीने मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही मिरवणुकांमधील मार्गांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतुक पोलीसांनी तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. तसेच दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडव्यात म्हणून दोन्ही मंडळातील पदाधिकारी काळजी घेत होते. रात्री उशीरा दोन्ही राजांचेविसर्जन करण्यात आले. 

यापूर्वी शुक्रवारी अनंत चतुर्थीला जिल्ह्यातील जवळपास ३६ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत वाजत-गाजत आणि मिरवणुकांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी रत्नागिरीतील समुद्र किनार्‍यांवर आणि विसर्जन तलावांवर भाविकांनी गर्दी केली होती.