रत्नागिरी:- आगामी पालिकांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राहूल पंडित यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात असून आरक्षण सोडतीनंतर यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. पंडित २०१६ साली शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून आले होते; परंतु पक्षादेशामुळे त्यांना अडीच वर्षातच राजीनामा द्यावा लागला. अर्धवट राहिलेली कारकिर्द ते शिंदे गटाकडून पूर्ण करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राहूल पंडित यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावरुन ‘मी पुन्हा येईन’ असे सुचित केले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर शिवसैनिक म्हणून पंडित यांची ओळख होती; मात्र सध्याच्या शिवसेनेतील राजकीय घडामोडींमध्ये पंडित यांनी शिंदे गटात गेलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सलगी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरच शिवसेनेकडून जिल्हा समन्वयकपदावरुन पंडित यांना हटवून संजय पुनसकर यांची नेमणूक केली. या निर्णयानंतर पंडित शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याला शिंदे गटातील काही निकटवर्तीयांकडूनही दुजोरा मिळत आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील त्यांचा अनुभव पाहता शिंदे गटाकडून त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यांची अडीच वर्षाची कारकीर्द कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीली होती. त्यात शहरातील सुधारीत नळपाणी योजनेची अंमलबजावणीसह विविध विकासकामांचा समावेश होता. मागील लोकसभा निवडणुकीवेळी पंडित यांच्याकडे विशेष जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. त्या काळात कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिने रजेवरही पाठवण्यात आले होते. तीन महिन्यांनी पंडित हे कागदोपत्री हजर झाले. तरीही त्यावेळी पडद्याआडून पालिकेचा कारभार बंड्या साळवीच पाहत होते. पुढे त्यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी राजीनामा ठेवल्यानंतर चर्चेला उधाण आले. पक्षांतर्गत झालेली राजीनाम्याची तडजोड नागरिकांना तितकीश रुचलेली नव्हती. तरीही चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी विजयी झालेले होते.