रत्नागिरी:- एकनाथ शिंदे यांच्या गटात कोकणातील आणखीन एक आमदार गळाला लागणार असे वृत्त वृत्तवाहिन्यांवर धडकल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले; मात्र त्या वृत्ताचे खंडन करत आमदार राजन साळवी यांनी विरोधक माझी बदनामी करण्यासाठी मिडियामधून हा प्रयत्न करत आहेत. मी हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मरेपर्यंत मी उध्दव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणूनच राहीन या खुलाशानंतर शिंदे गटात जाण्याच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
विधानसभा अधिवेशनादरम्यान शिवसेेनेतील शिंदे गटाबरोबर गेलेल्या बंडखोरांविरोधात मुळ शिवसैनिकांनी आक्रमक धोरण स्विकारले आहे. या परिस्थितीत आमदार साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात धडकले. सोशल मिडियावरुन हे वेगाने सगळीकडे पसरत होते. राजन साळवी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची चर्चा सुरु झाली होती. अधिवेशनाहून रत्नागिरीतील निवासस्थानी शुक्रवारी (ता. १९) परतलेल्या आमदार साळवी यांनी तात्काळ पत्रकारांशी संवाद साधत मी अशा प्रकारे कोणतीही भेट घेतली नसून माझ्या बाबतीत अफवा पसरवली जात असल्याची प्रतिक्रिया दिली.
आठवडा बाजार येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आमदार साळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला निष्ठा कोणी शिकवायची आवश्यकता नाही. शिंदे गटात जाणार अशी बदनामी केली जात आहे. हे कोण करतय याची माहिती आहे. पायाखालची वाळू घसरु लागल्यामुळे हा पर्याय त्यांच्याकडून अवलंबला गेला आहे. याला मी भिक घालत नाही. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्यांना पुढील निवडणूकीची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे ते सेनेच्या आमदारांना बदनाम करत आहेत. सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी आदित्य ठाकरे यांच्या सोबत दौर्यात सहभागी झालो आहे. मी प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. तसेच लवकरच शिवसेनेचा उपनेता म्हणून राज्यभरातील शिवसैनिकांची भेट घेणार आहे.
रोजगारासाठी रिफायनरी हवी: साळवी
रिफायनरी प्रकल्पाविषयी ते म्हणाले, नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बारसु येथे रिफायनरी प्रकल्पाला जागा देण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र शासनाला प्रस्ताव दिला होता. या ठिकाणी प्रकल्प आला तर राजापूर-लांजा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. यासाठी प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहे, असे आमदार साळवी यांनी सांगितले.









