रत्नागिरी:- तालुक्यातील उंडी फाटा येथे स्कुल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची जयगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्वप्नील सुरेश गुरव (36,रा.मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर स्कुलबस चालक सागर सुभाष खाडे (रा. जयगड, रत्नागिरी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील जिंदाल कंपनीत कामाला होता. बुधवारी सायंकाळी तो कंपनीतून घरी जात होता. त्याच सुमारास सागर खाडे आपल्या ताब्यातील स्कुलबस घेऊन समोरून येत होता. ही दोन्ही वाहने उंडी फाट्यावर आली असता सागरचा बसवरील ताबा सुटला आणि बसची धडक स्वप्नीलच्या दुचाकीला बसून हा अपघात झाला. यात स्वप्नीलला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.