केवळ दहा टक्केच नौका समुद्रात; नव्या हंगामाची सावध सुरुवात

रत्नागिरी:- बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलर, गिलनेटसह फिशिंगच्या नौका मासेमारीसाठी समुद्रावर स्वार झाल्या आहेत; मात्र हे प्रमाण अत्यंत कमी आहे. श्रावण महिना आणि खोल समुद्रात बिघडलेले वातावरण यामुळे बहूसंख्ये नौका बंदरातच उभ्या आहेत. मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना बांगडा, सुरमई, पापलेट आणि कोळंबी मिळत आहेत. काही नौका दोन दिवसांनी बंदरात येणार आहेत, तर रापणीला गेलेल्यांना दहा ते पंधरा किलो मासळी मिळाली आहे.

श्रावण महिन्याच्या तोंडावर मासेमारीला सुरवात झाली आहे. त्यामुळे काळबादेवी, कासारवेली, जयगडसह छोट्या बंदरांवरील बहूसंख्य मच्छीमारांनी बंदरात नांगर टाकलेला नाही. कासारवेली, काळाबादेवी परिसरातील सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे या कालावधीत तेथील मच्छीमार मासेमारीला जात नाहीत. हर्णे, मिरकरवाडासह राजापूरमधील काही नौका सोमवारी (ता. १) पहाटेला मासेमारीसाठी रवाना झाल्या. हर्णेतील ट्रॉलर्स् १० ते १२ वावाच्या पुढे मासेमारीला जातात. मासळी पकडून ते दोन दिवसांनी बंदरामध्ये परतात. तर एक सिलिंडरच्या छोट्या नौका किनार्‍यापासून काही अंतरावर मासे पकडण्यासाठी जातात. मिरकरवाडा बंदरातून गेलेल्या नौकांना एक किंवा दोन जाळी बांगडा मासा मिळाला आहे. सध्या बांगड्याचा दर १२० ते १५० रुपये किलो इतका आहे. खोल समुद्रात गेलेल्या नौकांना पापलेट, सुरमई, कोळंबी मिळत आहे. सध्या पापलेटचा दर किलोला ६०० रुपये आहे. श्रावण सुरु असल्यामुळे महिनाभर मासळीला मागणी कमी असते. सोमवारी सायंकाळी वार्‍याचा वेग वाढल्यामुळे पाण्याला करंट होता. मिरकरवाडा बंदरातील काही नौकांनी मासेमारीला जाणे टाळले. याला मच्छीमारांनीही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात ट्रॉलर्स, गिलनेटसह छोट्या मासेमारी नौकांची संख्या तिन हजारहून अधिक आहे; मात्र बंदी उठल्यानंतरच्या पहिल्या दिवशीच दहा टक्केचा नौका मासेमारीला रवाना झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.