रत्नागरी:- अतिसार किंवा डायरिया हे आजार पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहेत. अनेक बालके हे अतिसाराने दगावत आहेत. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळयात जास्त असते. या आजारापासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील 83 हजार 264 बालकांना मोफत ओआरएस देण्यात येणार आहे.
अतिसार नियंणाचे उद्दिष्ट हे अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे. या कालावधीत अतिसार लागण झालेल्या सर्व बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन त्यात सार्वजनिक आरोग्य विभागासोबत महिला बाल विकास, शिक्षण पाणीपुरवठा, डॉक्टर व अन्य अशासकीय संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे. अशाच प्रकारे तालुकास्तरावरही समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे अतिसार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामध्ये लहान बालकांना अधिक धोका असतो अशा वेळी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून ओआरएसची पाकीटे तसेच झिंक गोळ्या या घरोघरी देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन केले आहे.
गेल्या दोन वर्षात अतिसार साथ असलेल्या क्षेत्रात तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेल्या क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 5 वर्षांखालील बालकांच्या अतिसार व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकांना जेवण भरवण्यापूर्वी मातेने आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, कमी पाणी पीत असेल किंवा ताप येत असेल यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.