रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरीही मागील चार दिवस हलके वारे किनारपट्टी भागात वाहत आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी नोंद झाली असून चिपळूणात सर्वाधिक पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ५०.५६ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ४५, दापोली ४३, खेड ९२, गुहागर २७, चिपळूण ११३, संगमेश्वर ३६, रत्नागिरी ७, लांजा ५५, राजापूर ३७ मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी १४४७ मिलीमीटर पाऊस झाला असून गतवर्षी १४०४ मिमी नोंद झाली होती. गेले आठ दिवस थांबून थांबून पाऊस पडत असला तरीही भातशेतीसाठी समाधानकारक आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील भात लावणीची कामे ३० टक्केहून अधिक पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही येत्या काही दिवसात पूर्ण होतील असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. हवामान विभागाच्या सुचनेनुसार १० ते १४ जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी संबधित कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आवाहन केले आहे. तर १५ जुलैपर्यंत या कालावधीत जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.