रत्नागिरी:- माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर सोमवारी विजेचा खांब कोसळला. विद्युत खांब बसच्या बॉनेटवर पडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर महावितरणचा अनागोंदी कारभार समोर आला.
माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज येथे शिक्षणासाठी नांदिवली (ता. लांजा) भागातून विद्यार्थी येतात. नांदिवली येथून नाणीज येथे दररोज शाळेची बस क्रमांक (एमएच-०८-एपी-१२८६) मधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. दरम्यान रोडवरील बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.
दैव बलवत्तर म्हणून गाडीच्या पुढच्या भागावर हा खांब आदळला त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. चालक प्रशांत पांचाळ यांनी प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावून आले. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वर खांब कोसळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातानंतर तरी महावितरणने रस्त्याच्या जवळील, तसेच गावातील धोकादायक विजेचे खांब हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जोराच्या पावसामुळे, वाऱ्यामुळे धोकादायक स्थितीतील खांब कोसळण्याच्या घटना घडत आहेत.